१.प्रेम कहाणी
झोपाळ्यावर वेडी राधा तल्लीन होऊन झुलते रे
मोरपिसांची प्रेम कहाणी मनात माझ्या फुलते रे।
तुझ्या प्रीतीची रीत वेगळी
कधी कुणाला नाही कळली
नक्शत्रांच्या लक्श दिव्यांना प्रीत तुझी पण कळते रे।
नजर बोलते शब्दांवाचून
उरात माझ्या होते स्पंदन
तुझ्याचसाथी विरहव्यथेने व्याकुळ होऊन झुरते रे।
झाडामागे चंद्र थरथरे
रूश्ट भासती उल्का तारे
तुझी नि माझी प्रेम कहाणी त्या सार्यांना सलते रे।
थांब जरासा इथे एक शण
रूडी रितींचे फसवे कुंपण
ह्या सार्यांचे बंधन तोडून तुझ्यासवे मी येते रे
मोरपिसांची प्रेम कहाणी मनात माझ्या फुलते रे।
२ प्रेम म्हणजे काय रे
प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे
आपुलकीची ऊब मिळ्ता सहज उतू जाय रे।
प्रेम म्हणजे गात रहाणं आनंदाचं गोड गाणं
प्रेम म्हणजे पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये बेभान हॊण
प्रेम म्हणजे झुळझुळ झरा प्रेम म्हणजे अवखळ वारा
प्रेम म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या श्रावण धारा
प्रेम म्हणजे हळवं गीत प्रेम म्हणजे व्याकुळ प्रीत
प्रेम म्हणजे कुर्बानीची जगावेगळी न्यारी रीत
प्रेम म्हणजे असून नसणं प्रेम म्हणजे नसून असणं
प्रेम म्हणजे स्वतापासून स्वतालाच हरवून बसणं
प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे
आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय रे.
३. इथे फुलांचा उत्सव चालू
इथे फुलांचा उत्सव चालू तुझ्या कळ्यांना दे आमंत्रण
सांग तयांना देह आज मी या गंधाला दिलाय आन्दन
या वस्तीवर या घटकेला
सर्व रुतूंचे सहर्श स्वागत
रंग फुलांचे या रस्त्यावर
मिरवत जाती वाजत गाजत
संकेतांचे बंध तोडुनी कर रंगाचे सचैल शिंपण
आनंदाला बहर असा की
इंद्रधनूही उतरे खाली
अंधाराचा पडघम वाजे
वारा वाहे गंध पखाली
काळोखाच्या दरवाजावर नक्शत्रांचे सुंदर तोरण
इथे मनाचे मोर नाचती
फुलवुन अपुले स्वप्न पिसारे
असा घडे आनंदसोहळा
बेहोशीने गाती तारे
श्वासांसंगे श्वासांगणती आनंदाची करुन उधळण
काही छोट्या कविता
१. तू आहेस म्हणून माझ्या
आयुश्याला अर्थ आहे
तुझ्याविना माझ्या जिवा
उभा जन्म व्यर्थ आहे
मेघावाचून नभामधनं
पाणी कधी झरेल काय
तुला वजा केल्यावरती
मागे काही उरेल काय
२. डोळ्यामध्ये वादळ आणि
उरावरती घाव आहे
त्याच्या आड डबडबलेला
वेदनांचा गाव आहे
तिथले लाल गुलाब पाहून
माणसं फसतात चटदिशी
तिथे माझी स्वप्न गेलीत
माझ्या डोळ्यादेखत फाशी
३ डोळ्यांनी का होईना पण
आत्ताच बोलून घे गडे
तुला शब्द सुचतिल तेव्हा
कुठे असेल कुनास ठाऊक
तुला सूर सापडेल असे
काहीतरी आत्ताच कर
उद्या तुझ्या मैफलीत
असेन नसेन कुणास ठाऊक