प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Tuesday 27 October 2009

मी तिच्याशी अबोला धरतो तेव्हा...

निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
आता येईल फोन तिचा ’बोलत का नाहीस?
एसेमेसला माझ्या उत्तर पाठवत का नाहीस?
तुझं गाणं तुझे शब्द वेडं करतात मला!
झालं गेलं विसर आणि सोड ना अबोला!’
काळजाचा डोह माझ्या आठवणींनी भरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
तिचं हसणं तिचं बोलणं आणि तिची बडबड
तिचं मौन सोसणं मला जातं खूप अवघड
मीही तिच्यात गुंतलो होतो आता कळ्तं मला
तिचं नसणं कण कण जाळत असतं मला
तिलासुध्दा तिथे आता हाच विचार स्मरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
अन एकाएकी लागेल उचकी येईल तिचा फोन
मी सुध्दा हॅलो म्हणेन विसरून माझं मौन
तिचा स्वर कातर आणि शब्द ओथंबलेले
’का रे छळ्तोस असा माझे श्वास थांबलेले’
दोघांमधलं अंतर आता वारयासारखं सरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
-प्रसाद कुलकर्णी