प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Tuesday, 15 June 2010

आनंदयात्रेने ट्रिपल सेंच्युरी मारली तेव्हाची गोष्ट

१४ नोव्हेंबर २००७- आनंदयात्रेचा ३०० वा प्रयोग मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात आयोजीत केला होता. प्रमुख पाहुणे होते, मधु मंगेश कर्णिक, लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर आणि स्टार माझाचे राजीव खांडेकर. या प्रयोगाच्या पूर्वसंध्येला स्टार माझाने प्रसाद्ची जाहीर मुलाखत घेतली होती. १४ नोव्हेंबरचा प्रयोग जेवढा सुपरहिट झाला तेवढीच सुपरहिट होती ही मुलाखत देखील! सोबत आहे त्या मुलाखतीची संपादित चित्रफीत...

Tuesday, 27 October 2009

मी तिच्याशी अबोला धरतो तेव्हा...

निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
आता येईल फोन तिचा ’बोलत का नाहीस?
एसेमेसला माझ्या उत्तर पाठवत का नाहीस?
तुझं गाणं तुझे शब्द वेडं करतात मला!
झालं गेलं विसर आणि सोड ना अबोला!’
काळजाचा डोह माझ्या आठवणींनी भरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
तिचं हसणं तिचं बोलणं आणि तिची बडबड
तिचं मौन सोसणं मला जातं खूप अवघड
मीही तिच्यात गुंतलो होतो आता कळ्तं मला
तिचं नसणं कण कण जाळत असतं मला
तिलासुध्दा तिथे आता हाच विचार स्मरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
अन एकाएकी लागेल उचकी येईल तिचा फोन
मी सुध्दा हॅलो म्हणेन विसरून माझं मौन
तिचा स्वर कातर आणि शब्द ओथंबलेले
’का रे छळ्तोस असा माझे श्वास थांबलेले’
दोघांमधलं अंतर आता वारयासारखं सरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
-प्रसाद कुलकर्णी

Thursday, 26 February 2009

देव प्रसन्न झाला की

देव प्रसन्न झाला की

पहात नाही पात्र अपात्र

मग मझ्यासारख्याच्या ओंजळीत

टाकतो तुझ्यासारखं नक्षत्र

कवी: प्रसाद कुलकर्णी

Monday, 9 June 2008

प्रसादच्या कविता

१.प्रेम कहाणी

झोपाळ्यावर वेडी राधा तल्लीन होऊन झुलते रे

मोरपिसांची प्रेम कहाणी मनात माझ्या फुलते रे।

तुझ्या प्रीतीची रीत वेगळी

कधी कुणाला नाही कळली

नक्शत्रांच्या लक्श दिव्यांना प्रीत तुझी पण कळते रे।

नजर बोलते शब्दांवाचून

उरात माझ्या होते स्पंदन

तुझ्याचसाथी विरहव्यथेने व्याकुळ होऊन झुरते रे।

झाडामागे चंद्र थरथरे

रूश्ट भासती उल्का तारे

तुझी नि माझी प्रेम कहाणी त्या सार्यांना सलते रे।

थांब जरासा इथे एक शण

रूडी रितींचे फसवे कुंपण

ह्या सार्यांचे बंधन तोडून तुझ्यासवे मी येते रे

मोरपिसांची प्रेम कहाणी मनात माझ्या फुलते रे।

२ प्रेम म्हणजे काय रे

प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे

आपुलकीची ऊब मिळ्ता सहज उतू जाय रे।

प्रेम म्हणजे गात रहाणं आनंदाचं गोड गाणं

प्रेम म्हणजे पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये बेभान हॊण

प्रेम म्हणजे झुळझुळ झरा प्रेम म्हणजे अवखळ वारा

प्रेम म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या श्रावण धारा

प्रेम म्हणजे हळवं गीत प्रेम म्हणजे व्याकुळ प्रीत

प्रेम म्हणजे कुर्बानीची जगावेगळी न्यारी रीत

प्रेम म्हणजे असून नसणं प्रेम म्हणजे नसून असणं

प्रेम म्हणजे स्वतापासून स्वतालाच हरवून बसणं

प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे

आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय रे.

३. इथे फुलांचा उत्सव चालू

इथे फुलांचा उत्सव चालू तुझ्या कळ्यांना दे आमंत्रण

सांग तयांना देह आज मी या गंधाला दिलाय आन्दन

या वस्तीवर या घटकेला

सर्व रुतूंचे सहर्श स्वागत

रंग फुलांचे या रस्त्यावर

मिरवत जाती वाजत गाजत

संकेतांचे बंध तोडुनी कर रंगाचे सचैल शिंपण

आनंदाला बहर असा की

इंद्रधनूही उतरे खाली

अंधाराचा पडघम वाजे

वारा वाहे गंध पखाली

काळोखाच्या दरवाजावर नक्शत्रांचे सुंदर तोरण

इथे मनाचे मोर नाचती

फुलवुन अपुले स्वप्न पिसारे

असा घडे आनंदसोहळा

बेहोशीने गाती तारे

श्वासांसंगे श्वासांगणती आनंदाची करुन उधळण

काही छोट्या कविता

१. तू आहेस म्हणून माझ्या

आयुश्याला अर्थ आहे

तुझ्याविना माझ्या जिवा

उभा जन्म व्यर्थ आहे

मेघावाचून नभामधनं

पाणी कधी झरेल काय

तुला वजा केल्यावरती

मागे काही उरेल काय

२. डोळ्यामध्ये वादळ आणि

उरावरती घाव आहे

त्याच्या आड डबडबलेला

वेदनांचा गाव आहे

तिथले लाल गुलाब पाहून

माणसं फसतात चटदिशी

तिथे माझी स्वप्न गेलीत

माझ्या डोळ्यादेखत फाशी

डोळ्यांनी का होईना पण

आत्ताच बोलून घे गडे

तुला शब्द सुचतिल तेव्हा

कुठे असेल कुनास ठाऊक

तुला सूर सापडेल असे

काहीतरी आत्ताच कर

उद्या तुझ्या मैफलीत

असेन नसेन कुणास ठाऊक