प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Friday, 31 December 2010

आनंदयात्राचे विनामूल्य प्रयोग, नाबाद ४०० च्या निमित्ताने

'आनंदयात्रा' या माझ्या धमाल एकपात्री कार्यक्रमाचा ४०० वा प्रयोग ४ जानेवारी रोजी अकोला इथे क्षितिज विरंगुळा या अंध अपंग पुनर्वसन केंद्राच्या मदतीसाठी आयोजीत करण्यात आला आहे. गेल्या ५-६ वर्षांत या कार्यक्रमाने ह्जारो श्रोत्यांना आनंद दिला. अन मला श्रोत्यांचे प्रेम आणि कौतुक! सामान्य श्रोत्यांपासून सर्वश्री मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, कुमार केतकर, स्टार टीव्हीचे राजीव खांडेकर, यशवंत देव, श्रीधर फडके, शिवसेना नेते सुभाष देसाई,नटवर्य श्रीकांत मोघे, मोहनदास सुखटणकर, संगीतकार मिलींद इंगळे, अवधुत गुप्ते, कौशल इनामदार अशा असंख्य सेलिब्रेटीजचे प्रेमही मला लाभले. (ही काही नावे वानगीदाखल. प्रत्यक्षात ही यादी खूप् मोठी आहे). केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इंदौर, राजस्थान, बेंगलोर, दिल्ली, हैद्राबाद अशा परप्रांतातही आणि दुबई अबुधाबीसारख्या परदेशातही माझी ही आनंदयात्रा पोहोचली आणि श्रोत्यांना आनंद देऊन, मराठीची ओढ लाऊन आली. मराठीत शुभेच्छापत्रांची मुहुर्तमेढ रोवण्याचे उत्तरदायित्व परमेश्वराने माझ्यावर सोपवले आणि ते मी निभावले म्हणून की काय आनंदयात्रेच्या रुपाने लोकांना आनंद वाटण्याचे आनंददायी कामही पुन्हा त्याने मला दिले. नाबाद ४०० चा हा ट्प्पा आज गाठत असताना आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. आणि माझ्या या आनंदात सर्वांनाच सहभागी करुन घ्यावेसे वाटते. समाजाने मला दिलेल्या अलोट प्रेमाविषयी क्रुतद्न्यता म्हणून पुढचे ४ आठवडे गरजू संस्थांसाठी विनामूल्य प्रयोग करण्याचे मी ठरवले आहे. (अर्थात काही अटींवर).. -प्रसाद कुलकर्णी kulpras@yahoo.co.in