प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Wednesday, 14 December 2011

ती मौनाने बोलत जाते

ती मौनाने बोलत जाते
मी प्राणांनी ऐकत जातो
ती गालावर गोंदत जाते
मी ओठांनी वाचत जातो!

ती सुंदर ती लोभसवाणी
आनंदाची गाते गाणी
ती नाजुकसे फूल जुईचे
तिच्या मनाला पंख सायीचे
ती श्वासांवर तोलत जाते
मी श्वासांनी झेलत जातो
ती गालावर गोंदत जाते
मी ओठांनी वाचत जातो!


ती चाफ्यापरी मुसमुसलेली
ती केतकीपरी रसरसलेली
ती दरवळते जुई जाईतुन
ती रिमझिमते श्रावण होऊन
ती टपटपते प्राजक्तातुन
मी नजरेने वेचत जातो
ती गालावर गोंदत जाते
मी ओठांनी वाचत जातो!

-प्रसाद कुलकर्णी

.

Thursday, 8 December 2011

'मन मोहरले' ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन

‎'मन मोहरले' हा माझा १६ वा म्युझिक अल्बम (आणि पहिला सोलो) मंगळवार दिनांक २२/११/ २०११ या दिवशी संगीतकार राहुल रानडे, सिनेदिग्दर्शक राजू पार्सेकर आणि आमदार अशोकभाऊ जाधव यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला.
जेष्ठ संगीतकार सय्यद अली यांनी माझ्या शब्दांना स्वरसाज चढवला असून इंडियन आयडॉल अभिजीत सावंत, अभिलाषा चेल्लम आणि मंगेश बोरगावकर यांचा आवाज या गाण्यांना लाभला आहे. सिद्धेश सावंत आणि महेश खोपडे या दोन रसिक तरुणांच्या प्रयत्नातून ही सीडी साकार झाली आहे.

आणि एच.एम.व्ही. सारेगामा इंडिया प्रा.लि या नामांकीत संस्थेने या सीडीची निर्मिती केली आहे.

-प्रसाद कुलकर्णी