आनंद ही मानवी ्जीवनातील सर्वात अमूल्य गोष्ट आहे. परमेश्वराने ती आपल्याला विनामूल्य दिलेली आहे. तरी अनेकांना त्याची जाणीव नसते. असे प्रतिपादन लोकप्रिय कवी श्री प्रसाद कुलकर्णी यांनी केले. सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर असणार्या ’पनवेल कल्चरल सेंटर’ तर्फे होळीनिमित्त कुलकर्णी यांचा आनंदयात्रा हा एकपात्री कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. विविध किस्से, कविता, अनुभव याद्वारे श्रोत्यांना तुफान हसवता हसवता त्यांनी मानवी नातेसंबंधाविषयी हृदयस्पर्शी विचार मांडून श्रोत्यांना अंतर्मुखही केले.
परमेश्वर दररोज आपल्याला २४ तासांचा चेक देतो. या धनादेशाच्या देणगीची बरयाच लोकांना कल्पना नसते. ज्या सुदैवी माणसांना याची जाणीव असते ते त्याचा पुरेपुर उपयोग करुन आपले आणि आपल्यासोबत इतरांचे जीवनही आनंददायी करुन टाकतात. त्यांच्या या निरिक्षणावर श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मराठी शुभेच्छापत्रांची मुहुर्तमेढ रोवणारया या कवीने आपले या क्षेत्रातले खुसखुशीत अनुभवही यावेळी कथन केले.
अडीच तासांहून अधिक वेळ रंगलेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांचा भरभरुन प्रतिसाद लाभला. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. तर नंदकुमार गोगटे यांनी त्यांचा परिचय करुन दिला.
(लोकसत्ता मधून साभार. सविस्तर महितीकरता संदर्भ लोकसत्ता, गुरुवार ०३ मार्च २०१०)
No comments:
Post a Comment