प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Wednesday, 14 December 2011

ती मौनाने बोलत जाते

ती मौनाने बोलत जाते
मी प्राणांनी ऐकत जातो
ती गालावर गोंदत जाते
मी ओठांनी वाचत जातो!

ती सुंदर ती लोभसवाणी
आनंदाची गाते गाणी
ती नाजुकसे फूल जुईचे
तिच्या मनाला पंख सायीचे
ती श्वासांवर तोलत जाते
मी श्वासांनी झेलत जातो
ती गालावर गोंदत जाते
मी ओठांनी वाचत जातो!


ती चाफ्यापरी मुसमुसलेली
ती केतकीपरी रसरसलेली
ती दरवळते जुई जाईतुन
ती रिमझिमते श्रावण होऊन
ती टपटपते प्राजक्तातुन
मी नजरेने वेचत जातो
ती गालावर गोंदत जाते
मी ओठांनी वाचत जातो!

-प्रसाद कुलकर्णी

.

Thursday, 8 December 2011

'मन मोहरले' ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन

‎'मन मोहरले' हा माझा १६ वा म्युझिक अल्बम (आणि पहिला सोलो) मंगळवार दिनांक २२/११/ २०११ या दिवशी संगीतकार राहुल रानडे, सिनेदिग्दर्शक राजू पार्सेकर आणि आमदार अशोकभाऊ जाधव यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला.
जेष्ठ संगीतकार सय्यद अली यांनी माझ्या शब्दांना स्वरसाज चढवला असून इंडियन आयडॉल अभिजीत सावंत, अभिलाषा चेल्लम आणि मंगेश बोरगावकर यांचा आवाज या गाण्यांना लाभला आहे. सिद्धेश सावंत आणि महेश खोपडे या दोन रसिक तरुणांच्या प्रयत्नातून ही सीडी साकार झाली आहे.

आणि एच.एम.व्ही. सारेगामा इंडिया प्रा.लि या नामांकीत संस्थेने या सीडीची निर्मिती केली आहे.

-प्रसाद कुलकर्णी







Monday, 23 May 2011

म्हाताऱ्या आईची गोष्ट

मुंबई सकाळ मध्ये या वर्षीच्या १ जानेवारीपासून दर सोमवारी माझं 'गुड मॉर्निंग' हे सदर सुरु आहे.
सकाळ हे माझं होम पीच!. आणि त्यामुळे संपादकीय विभागातले माझे मित्र नेहमीच माझ्याकडून चांगलं चांगलं लिहून घेतात.
हे सदर खूप लोकप्रिय झालय आणि मला मेल्स वा फोनद्वारे त्याचा सतत फीडबॅक मिळत असतो.
क्रुतार्थ वाटावी अशी गोष्ट म्हणजे अलीकडेच मंगेश पाडगावकरांनी मला प्रत्यक्ष भेटीत सांगितलं की तुमचं सदर खूप चांगलं असतं आणि मी ते नियमित वाचतो. तुम्ही खूप छान लिहिता. यावर सुखद धक्का म्हणून की काय त्याच्या दुसऱ्याच दिवशी मला ज्यॆष्ठ पत्रकार कुमार केतकरांची मेल आली आणि त्यातही त्यांनी माझ्या लिखाणाचं मनापासून कौतुक केलं होतं. केतकरांसारख्या पत्रकारीतेतल्या भिष्माचार्यांनी स्व:ताहून अशी दाद देणं ही माझ्याकरता भारावून टाकणारी गोष्ट होती. त्यावर कडी म्हणून की काय, दोन दिवसांनी एका समारंभात ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक भेटले. त्यांनीही माझी पाठ थोपटत हीच भावना व्यक्त केली.
आता हे सारं मला माझ्या ब्लॉगवरल्या मित्रांशी शेअर करावसं वाटलं. विशेष करुन या सदरात मागील आठवड्यात मी लिहिलेली 'म्हाताऱ्या आईची गोष्ट'. या एका गोष्टीनेच मला खूप मोठ्ठं फॅन फॉलोईंग मिळवून दिलं. आणि माझ्या या भावना मी सकाळचे संपादक पद्मभूषण देशपांडे यांच्याशीही शेअर केल्या.
खरं खणजे ही गोष्ट नसून एक मुक्त कविता आहे. आणि ती वाचून तुमचा तुमच्या आईवडीलांकडे पहाण्याचा द्रुष्टीकोन बदलला तर ती मी माझ्या कवितेची परतफेड समजतो. क्रुपया तुमच्या भावना आणि प्रतिक्रिया मला माझ्या मेलवर कळवायला विसरु नका.
-प्रसाद कुलकर्णी
kulpras@yahoo.co.in - on behalf of Namrata

Saturday, 14 May 2011

आनंदयात्रा ४२५ व्या प्रयोगाची क्षणचित्रे

आनंदयात्राचा एक विशेष प्रयोग गुरुवार दिनांक २१ एप्रिल रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात संपन्न झाला. या सोहळ्याला आदरणीय पंडीत यशवंत देव, छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, ज्येष्ठ गोदी कामगार नेते आणि माजी महापौर शांती पटेल आणि मी मराठी वाहिनीचे पराग छापेकर उपस्थित होते. या शानदार सोहळ्याची ही क्षणचित्रे.
सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींच्या हस्ते प्रसाद्चा सत्कार
आईच्या भूमिकेतून आशालताबाई आशीर्वाद देताना
देवांचा मूड असा मस्त लागला आणि गौतमजींची दिलखुलास दाद
देवांचा ही सत्कार
आणि हे "मेनी मूड्स"
रंगून गेलेले श्रोते आणि कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद सुखटणकर या वेड्या मित्राने भारावून जाऊन मारलेली मिठी आणि भारावून बघणारी त्याची आई -(नम्रता १४०५२०११)

Saturday, 9 April 2011

सर्वांना अत्याग्रहाचे निमंत्रण

प्रसादच्या आनंदयात्रा चा ४२५ वा प्रयोग गुरुवार दिनांक २१ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. गेल्या काही वर्षात हा कार्यक्रम भन्नाट लोकप्रिय झाला असून अनेक नामवंतांनी, नेते, अभिनेते, पत्रकार, लेखक इथपासून गावागावातील सामान्य शेतकरी, मजूर, कामगार अशा सर्व थरातल्या लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. या ४२५ व्या कार्यक्रमाला ज्येष्ठ कामगार नेते श्री. शांती पटेल, संगीतकार पंडीत यशवंत देव, जागतिक किर्तीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष, मुंबई महानगरपालिका सभाग्रुह नेते सुनिल प्रभू आणि मी मराठी वाहिनीचे पराग छापेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी हॉलवर उपलब्ध आहेत. आगाऊ नोंदणीसाठी श्री अशोक वायकूळ यांच्याशी ९८६९३३७३०३ किंवा ९९६९०७७१३३ या नंबर वर संपर्क साधावा. सर्वांना अत्याग्रहाचे निमंत्रण! -नम्रता

Friday, 21 January 2011

आनंदयात्राचा अविस्मरणीय प्रयोग- मुक्काम अकोला

हिंदी पेपर्सनी सुद्धा घेतली दखल..................नजर लागावी अशी गर्दी ही शुभेच्छांची एक्स्प्रेस........................................................आणि मंत्रमुग्ध श्रोते
्कवितांची रिमझिम आणि .......................................................रसिकांचा प्रतिसाद
आणि असा लागलेला सूर.... ४ जानेवारी २०११ रोजी प्रसादच्या आनंदयात्रा या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय ठरलेल्या एकपात्री कार्यक्रमाचा ४०० वा प्रयोग अकोला इथे आयोजीत करण्यात आला होता. ४ जानेवारी हा त्याचा वाढदिवस असूनही क्षितिज-विरंगुळा या अंध-अपंग-मतिमंद मुलांच्या संस्थेकरता निधी गोळा करुन देण्याच्या उद्देशाने त्याने हा कार्यक्रम विनामूल्य करायचं ठरवलं होतं.
३ जानेवारी रोजी मुंबईहून अकोल्याला घेऊन जाणारी हावडा मेल ८ तास लेट म्हणजे रात्री ८.३० ऐवजी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता सुटली. ती सारी रात्र दादर रेल्वे स्टेशनवर कडाक्याच्या थंडीत घालवावी लागली. तिकीट चेकींग, बर्थ लावणे हे सारे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत सकाळचे ६ वाजले होते. आता अंथरुणावर पडणार एवढ्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा सेल वाजला. आणि त्यानंतर शुभेच्छांच्या फोन आणि एसेमेस ची रांगच लागली. एकदा त्याला वाटलं फोन बंद करुन टाकावा आणि झोपून जावं. मग त्याने विचार केला आपले मित्र, चाहते आपल्यावरच्या प्रेमापोटी आपल्याला फोन करतायत आणि आपण फोन बंद करायचा हे मुळीच बरोबर नाही. (दुसऱ्यांचा भावनांची आजवर तो नेहमीच कदर करत आलाय) आणि मग शुभेच्छांची ही आनंदयात्रा पुढचे बारा तास अकोला येईपर्यंत अशीच चालू राहिली. आदल्या २ रात्री रेकॉर्डींगकरता जागवलेल्या, ४ जानेवारीची रात्र दादर स्टेशनवर कडाक्याच्या थंडीत, अन १२ तासांचा मुंबई ते अकोला हा शुभेच्छांना प्रतिसाद देत केलेला प्रवास..... ४०० व्या कार्यक्रमाचे बारा वाजणार हे निश्चित झालं होतं. कारण दूरध्वनीवरून आधीच मिळालेल्या माहितीवरुन तिकीटं सारी विकली गेली होती, आणि प्रमिलाताई ओक सभाग्रुह आधीच हाऊसफुल्ल झालं होत.
पण संध्याकाळी ७ वाजता तो बोलायला उभा राहीला आणि पहिल्या पाच मिनिटांतच त्याने प्रेक्षकांना आपलसं केलं. पुढचे दोन तास सभाग्रुहात अखंड टाळ्या आणि हशा बरसत होता. दोन तासांनंतर तो अक्षरश: थकला तेव्हा त्याने कार्यक्रम नाईलाजाने थांबवला. अन्यथा रसिकाम्ची रात्री ११ वाजेपर्यंत थांबायचीही तयारी होती. या पोस्टवरती या कार्यक्रमाची काही छायाचित्रं आणि प्रेस रिपोर्टस टाकलेयत ते हा व्रुत्तांत अधोरेखीत करायला पुरेसे आहेत.
आणि हा कार्यक्रम सुरेख्ररित्या आयोजीत करण्याचं श्रेय जातं अकोल्याच्या सौ.मंजुश्री आणि उदय कुलकर्णी या दाम्पत्याला आणि त्यांच्या क्षितिज विरंगुळाच्या सर्व सहकाऱ्यांना..... आज या कार्यक्रमाला बरोब्बर १५ दिवस झाले तरी अकोल्याच्या रसिक प्रेक्षकाम्चे फोन्स किंवा मेल्स येतायत.
-नम्रता २१/०१/२०११