प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Saturday, 27 April 2013

अशीच यावी वेळ एकदा.... (अल्बम-सांजगारवा, कवी-प्रसाद कुलकर्णी)

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,
जवळ नसावे चिट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर

मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना

हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला

सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले
 - प्रसाद कुलकर्णी

1 comment: