प्रसाद कुलकर्णी - नव्या पिढीचा आनंदी आणि आशावादी कवी.

उत्कटता हा त्याच्या कवितेचा आणि स्वभावाचाच गुणविशेष.
तो आयुष्यावर प्रेम करतो. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगावर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक घटनेवर, प्रत्येक अनुभवावर तो प्रेम करतो.
मराठी भाषेत शुभेच्छापत्रं सुरु करण्याचा मान त्याच्याकडे जातो.
४ कवितासंग्रह.... १२ चित्रपट.... १६ ध्वनिफिती.... ४५०० हून अधिक शुभेच्छापत्रं.... लोकप्रभा, सकाळ, नवशक्ती आणि लोकसत्तासारख्या ६ लोकप्रिय दैनिकातलं स्तंभलेखन.... जाहीरात क्षेत्रातल्या टॉपच्या जाहिरात एजन्सीज करता कॉपीरायटींग.... रेडीयो, टिव्हीवरचे अगणित कार्यक्रम.... एवढं बख्खळ ग्रहबळ पाठीशी असूनही त्याची खरी ओळख आहे आनंदयात्री हीच.


Friday, 21 January 2011

आनंदयात्राचा अविस्मरणीय प्रयोग- मुक्काम अकोला

हिंदी पेपर्सनी सुद्धा घेतली दखल..................नजर लागावी अशी गर्दी ही शुभेच्छांची एक्स्प्रेस........................................................आणि मंत्रमुग्ध श्रोते
्कवितांची रिमझिम आणि .......................................................रसिकांचा प्रतिसाद
आणि असा लागलेला सूर.... ४ जानेवारी २०११ रोजी प्रसादच्या आनंदयात्रा या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय ठरलेल्या एकपात्री कार्यक्रमाचा ४०० वा प्रयोग अकोला इथे आयोजीत करण्यात आला होता. ४ जानेवारी हा त्याचा वाढदिवस असूनही क्षितिज-विरंगुळा या अंध-अपंग-मतिमंद मुलांच्या संस्थेकरता निधी गोळा करुन देण्याच्या उद्देशाने त्याने हा कार्यक्रम विनामूल्य करायचं ठरवलं होतं.
३ जानेवारी रोजी मुंबईहून अकोल्याला घेऊन जाणारी हावडा मेल ८ तास लेट म्हणजे रात्री ८.३० ऐवजी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता सुटली. ती सारी रात्र दादर रेल्वे स्टेशनवर कडाक्याच्या थंडीत घालवावी लागली. तिकीट चेकींग, बर्थ लावणे हे सारे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत सकाळचे ६ वाजले होते. आता अंथरुणावर पडणार एवढ्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा सेल वाजला. आणि त्यानंतर शुभेच्छांच्या फोन आणि एसेमेस ची रांगच लागली. एकदा त्याला वाटलं फोन बंद करुन टाकावा आणि झोपून जावं. मग त्याने विचार केला आपले मित्र, चाहते आपल्यावरच्या प्रेमापोटी आपल्याला फोन करतायत आणि आपण फोन बंद करायचा हे मुळीच बरोबर नाही. (दुसऱ्यांचा भावनांची आजवर तो नेहमीच कदर करत आलाय) आणि मग शुभेच्छांची ही आनंदयात्रा पुढचे बारा तास अकोला येईपर्यंत अशीच चालू राहिली. आदल्या २ रात्री रेकॉर्डींगकरता जागवलेल्या, ४ जानेवारीची रात्र दादर स्टेशनवर कडाक्याच्या थंडीत, अन १२ तासांचा मुंबई ते अकोला हा शुभेच्छांना प्रतिसाद देत केलेला प्रवास..... ४०० व्या कार्यक्रमाचे बारा वाजणार हे निश्चित झालं होतं. कारण दूरध्वनीवरून आधीच मिळालेल्या माहितीवरुन तिकीटं सारी विकली गेली होती, आणि प्रमिलाताई ओक सभाग्रुह आधीच हाऊसफुल्ल झालं होत.
पण संध्याकाळी ७ वाजता तो बोलायला उभा राहीला आणि पहिल्या पाच मिनिटांतच त्याने प्रेक्षकांना आपलसं केलं. पुढचे दोन तास सभाग्रुहात अखंड टाळ्या आणि हशा बरसत होता. दोन तासांनंतर तो अक्षरश: थकला तेव्हा त्याने कार्यक्रम नाईलाजाने थांबवला. अन्यथा रसिकाम्ची रात्री ११ वाजेपर्यंत थांबायचीही तयारी होती. या पोस्टवरती या कार्यक्रमाची काही छायाचित्रं आणि प्रेस रिपोर्टस टाकलेयत ते हा व्रुत्तांत अधोरेखीत करायला पुरेसे आहेत.
आणि हा कार्यक्रम सुरेख्ररित्या आयोजीत करण्याचं श्रेय जातं अकोल्याच्या सौ.मंजुश्री आणि उदय कुलकर्णी या दाम्पत्याला आणि त्यांच्या क्षितिज विरंगुळाच्या सर्व सहकाऱ्यांना..... आज या कार्यक्रमाला बरोब्बर १५ दिवस झाले तरी अकोल्याच्या रसिक प्रेक्षकाम्चे फोन्स किंवा मेल्स येतायत.
-नम्रता २१/०१/२०११

Friday, 31 December 2010

आनंदयात्राचे विनामूल्य प्रयोग, नाबाद ४०० च्या निमित्ताने

'आनंदयात्रा' या माझ्या धमाल एकपात्री कार्यक्रमाचा ४०० वा प्रयोग ४ जानेवारी रोजी अकोला इथे क्षितिज विरंगुळा या अंध अपंग पुनर्वसन केंद्राच्या मदतीसाठी आयोजीत करण्यात आला आहे. गेल्या ५-६ वर्षांत या कार्यक्रमाने ह्जारो श्रोत्यांना आनंद दिला. अन मला श्रोत्यांचे प्रेम आणि कौतुक! सामान्य श्रोत्यांपासून सर्वश्री मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, कुमार केतकर, स्टार टीव्हीचे राजीव खांडेकर, यशवंत देव, श्रीधर फडके, शिवसेना नेते सुभाष देसाई,नटवर्य श्रीकांत मोघे, मोहनदास सुखटणकर, संगीतकार मिलींद इंगळे, अवधुत गुप्ते, कौशल इनामदार अशा असंख्य सेलिब्रेटीजचे प्रेमही मला लाभले. (ही काही नावे वानगीदाखल. प्रत्यक्षात ही यादी खूप् मोठी आहे). केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इंदौर, राजस्थान, बेंगलोर, दिल्ली, हैद्राबाद अशा परप्रांतातही आणि दुबई अबुधाबीसारख्या परदेशातही माझी ही आनंदयात्रा पोहोचली आणि श्रोत्यांना आनंद देऊन, मराठीची ओढ लाऊन आली. मराठीत शुभेच्छापत्रांची मुहुर्तमेढ रोवण्याचे उत्तरदायित्व परमेश्वराने माझ्यावर सोपवले आणि ते मी निभावले म्हणून की काय आनंदयात्रेच्या रुपाने लोकांना आनंद वाटण्याचे आनंददायी कामही पुन्हा त्याने मला दिले. नाबाद ४०० चा हा ट्प्पा आज गाठत असताना आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. आणि माझ्या या आनंदात सर्वांनाच सहभागी करुन घ्यावेसे वाटते. समाजाने मला दिलेल्या अलोट प्रेमाविषयी क्रुतद्न्यता म्हणून पुढचे ४ आठवडे गरजू संस्थांसाठी विनामूल्य प्रयोग करण्याचे मी ठरवले आहे. (अर्थात काही अटींवर).. -प्रसाद कुलकर्णी kulpras@yahoo.co.in

Wednesday, 1 September 2010

पहिला इंडियन आयडॉल, अभिजीत सावंत गातोय माझी गाणी

नमस्कार.
्पहिला इंडियन आयडॉल, अभिजीत सावंतने आमच्या आगामी अल्बमकरता माझं गाणं गाण्याचा योग नुकताच आला. गॊड मुलगा आणि खूप मेहनती सुद्धा.
मी त्याचं वर्णन एका ओळीत करेन... milky boy with a silky voice. चार तास आम्ही न कंटाळता एका गाण्याचं रेकॉर्डींग करत होतो. आणि आम्हाला ’मॅनेज’ करत होते आमचे संगीतकार, श्री. सैयद अली.
आमचा हा म्युझिक अल्बम सुपरहीट होणार असा आम्हाला तिघांनाही विश्वास आहे. फक्त आणखी तीन महीने वाट पहा.
त्यात एकूण आठ गाणी असतील.
या टायटल सॉंगचे बोल आहेत -
लपवूनही लपवेना, अन धीरही धरवेना
हीच खरी प्रेमाची रीत असावी का?
प्रीत जिला म्हणती ती हीच असावी का?
-प्रसाद कुलकर्णी

Sunday, 8 August 2010

छगन भुजबळ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री छगन भुजबळ यांना भेटणं हा माझ्याकरता परवा एक चकीत करणारा अनुभव होता. या भेटीची मला संधी मिळाली ती माझे जवळचे मित्र असलेल्या प्रमोद आणि शैलेश या पेडणेकर बंधूंमुळे. आणि ही भेट झाली त्यांच्या मलबार हिलवरल्या ’रामटेक’ या निवासास्थानी. साधारणपणे कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटायला मी फारसा उत्सुक नसतो. पण माझ्यावर निरातिशय प्रेम करणार्या प्रमोद्ची ही दांडगी इच्छा होती.
त्यांना भेटायला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून माणसे आली होती. आणि आम्ही निघेपर्यंत अखंडीत येतही होती. मला अप्रूप वाटावी अशी गोष्ट ही की या सार्या धबडग्यातूनही त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला.
आजच्या तरुणांना (खरे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला) सकारात्मक मनोव्रुत्तीची गरज आहे याबद्दल ते माझ्याशी सहमत होते. ज्यांना भुजबळसाहेबांचा संघर्षमय राजकीय प्रवास ठाऊक आहे ते माझ्याशी याबाबतीत सहमत होतील की ते स्वत:च सकारात्मक मनोव्रुत्तीचं एक चालतंबोलतं उदाहरण आहेत. माझ्या आनंदयात्राच्या मुंबईतील पुढल्या प्रयोगाला यायचं त्यांनी कबूल केलंय. मी त्यांना ४००व्या प्रयोगाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं नक्की केलंय.
-प्रसाद कुलकर्णी

Thursday, 22 July 2010

्स्टार माझा वरल्या पाऊस गप्पा

स्टार माझा वर झालेला पाऊस गप्पांचा कार्यक्रम - शनिवार दिनांक १८ मे २०१०
सहभाग- प्रसाद कुलकर्णी, अरुण म्हात्रे, पद्मजा फेणाणी आणि मिलिंद भागवत

Monday, 21 June 2010

मंगेश पाडगावकर, अशोक नायगावकर आणि प्रसाद कुलकर्णी एकत्र

मंगेश पाडगावकर, अशोक नायगावकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी एकत्र एकाच मंचावर तीन तास धमाल केली, सोलापूर येथे दिनांक १८ जून २०१० रोजी. हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजीत केला होता, थर्ड बेल एंटरटेनमेंट या इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेने. तीन पिढ्यांचे तीन कवी एकत्र आणण्याची कल्पना होती स्वप्नील रास्ते यांची. नाट्यग्रुह तुडुंब भरुन बाहेर क्लोज सर्कीट टिव्ही लावावे लागले तेव्हा ती अपेक्षेपेक्षा यशस्वी झाल्याची पावती मिळाली. हे फोटो आहेत कार्यक्रम संपल्यानंतरच्या क्रुतार्थ क्षणांचे. (ताजा कलम - वरील फोटोतले रिकामे ग्लास पाण्याचे आहेत याची नोंद घ्यावी.)
-नम्रता

Tuesday, 15 June 2010

आनंदयात्रेने ट्रिपल सेंच्युरी मारली तेव्हाची गोष्ट

१४ नोव्हेंबर २००७- आनंदयात्रेचा ३०० वा प्रयोग मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात आयोजीत केला होता. प्रमुख पाहुणे होते, मधु मंगेश कर्णिक, लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर आणि स्टार माझाचे राजीव खांडेकर. या प्रयोगाच्या पूर्वसंध्येला स्टार माझाने प्रसाद्ची जाहीर मुलाखत घेतली होती. १४ नोव्हेंबरचा प्रयोग जेवढा सुपरहिट झाला तेवढीच सुपरहिट होती ही मुलाखत देखील! सोबत आहे त्या मुलाखतीची संपादित चित्रफीत...